केंद्रात सत्ता असताना आणि भाजपाचे खासदार असतांनाही बीडचे आयकर कार्यालय जातेच कसे – बजरंग सोनवणे यांचा सवाल.

बीड (दि. २५) :- केंद्रात भाजपचे सरकार बीड जिल्ह्यात भाजपचे खासदार असताना बीडचे आयकर कार्यालय औरंगाबाद आणि जालन्याला जातेच कसे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने आयकर विभागात काही फेरबदल करताना गेली अनेक वर्षे करदाते नागरिक, चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार यांना सेवा देणारे आयकर कार्यालय बीड येथून औरंगाबाद आणि जालन्याला हलवले आहे. सप्टेंबर पासून बीडचे कार्यालय जवळपास बंदच आहे. थोडक्यात काय तर आता करदात्या नागरिकांना जालना आणि औरंगाबादला हेलपाटे मारावे लागणार आहेत. १९७१ साली तत्कालीन खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीडचे आयकर कार्यालय सुरू करण्यात आले होते. ते कार्यालय आता २०२० साली सध्याच्या खासदारांच्या निष्क्रियतेमुळे बीड जिल्ह्या बाहेर जाणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही बजरंग सोनवणे म्हणाले. खासदार ताईंनी वेळीच जागृत राहून आयकर कार्यालय बाहेर जाऊ दिले नसते तर आता निवेदने देण्याची नौटंकी करण्याची वेळच आली नसती. जिल्ह्यात ८० हजारहुन अधिक नोंदणीकृत आयकर प्रपत्र आहेत. तर १२ लाखांपेक्षा जास्त पॅन रजिस्टर आहेत. जिल्ह्यातील करदाते नागरिक, कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट या सर्वांनाच आता औरंगाबाद आणि जालना येथे हेलपाटे मारावे लागतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, याला जिल्ह्याच्या खासदारांचा निष्क्रियपणा जबाबदार नाही का? असा संतप्त सवाल श्री. सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. आहेत ती कार्यालये तरी सांभाळा! केंद्रात सहा वर्षे भाजपचे सरकार आहे, खासदार ताई देखील दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यातून खासदार म्हणून निर्वाचित आहेत, असे असताना नवीन कोणती कार्यालये जिल्ह्यात आणता येत नाहीत हे तर आता सिद्ध झाले आहेत; पण जिल्ह्यात जी कार्यालये आहेत ते तरी लक्ष देऊन सांभाळा असा टोलाही श्री. सोनवणे यांनी लगावला आहे. आयकर विभागाने बीडचे कार्यालय बाहेर पळवल्या नंतर ताईंना जाग आली, ही जाग आधी का आली नसावी असा सवाल यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *