कालच्या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

अंबाजोगाई : दिवसभर व रात्रीतून जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात व जिल्ह्यातील अन्य ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने ऊस व अन्य शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी व संबंधितांना दिले आहेत.

रविवारी व सोमवारी पावसाने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना झोडपून काढले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बु., पाटोदा, देवळा, अकोला, तडोळा, ममदापुर, यांसह जिल्ह्यातील अन्य काही गावांमध्ये प्रामुख्याने ऊस व अन्य काही पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे.

अशा परिस्थितीत संभाव्य नुकसान टाळून संबंधित शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये यासाठी तातडीने जास्त पाऊस होऊन शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पंचनामे करण्यात यावेत व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाला ना. मुंडे यांनी दिले आहेत.

56 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *