करोना उपचारांसाठी जास्त पैसे उकळले; मुंबईतील ‘या’ बड्या रुग्णालयावर गुन्हा
मुंबई:करोना बाधित रुग्णाकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे उकळल्या प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
करोना बाधित रुग्णांवरील उपचारांबाबत शासन, मुंबई महापालिका यांनी उपचार शुल्क आकारणीबाबत सूचना जारी केल्या आहेत. या आदेशांचे पालन होते का?, हे पडताळण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांवर निरीक्षक नेमले आहेत. दादर येथे राहणारी करोना बाधित महिला नानावटी रुग्णालय येथे ३१ मे रोजी दाखल झाली. उपचारादरम्यान १३ जूनला या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित कुटुंबाने महापालिकेकडे रुग्णालयाने जास्त शुल्क आकारल्याबाबत तक्रार केली. याबाबत पालिकेच्या खासगी रुग्णालय निरीक्षकाने चौकशी, तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. महिलेच्या उपचारांसाठी प्रतिदिन पाच पीपीई किट, तीन एन ९५ मास्क (उपलब्ध असूनही), ऍस्पिरिन, पॅरासीटामॉल, बी कॉम्प्लेक्स आदी नियमित वापराची औषधे ‘पॅकेज’मध्ये समाविष्ठ असूनही त्याचे वेगळे शुल्क आकारले गेले. काही वैद्यकीय चाचण्या अनेकदा केल्या गेल्या. तर काही मध्यरात्री १ ते ३ या वेळेत करण्यात आल्या, अशी माहिती निरीक्षकाला मिळाली.
नातेवाईकांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निरीक्षकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रुग्णालय विश्वस्त मंडळावर भारतीय दंड संहितेतील कलम १८८ (शासकीय आदेशाचे उल्लंघन), ३४ (सामाईक इरादा) नुसार गुन्हा नोंदवला.
दरम्यान, बिलाच्या संदर्भातील कथित फरकामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील एफआयआरची प्रत आम्हाला अजून प्राप्त झालेली नाही. या प्रकरणामध्ये तपासास आम्ही पूर्ण सहकार्य देऊ, नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयाने ई-मेलद्वारे माध्यमांकडे आपले म्हणणे मांडले आहे.