औरंगाबाद शहरातील संचारबंदी अधिक कडक करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

औरंगाबाद : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या साहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरातील सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना PPE kit (personal Protection Equipment) अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतील तसेच याकामी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज, २६ एप्रिल रोजी येथे सांगितले. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी अधिक कडक करावी जेणेकरून नवीन रुग्णांची भर पडणार नाही, असेही टोपे यावेळी म्हणाले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस उपायुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, उपायुक्त वर्षा ठाकुर, पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी, घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून बैठक पार पडली.
आरोग्यमंत्री म्हणाले की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील नियोजन अत्यंत बारकाईने करणे आवश्यक आहे. शहरातील मृत्युदर पाहता प्रत्येक रुग्णांचा अभ्यास करणे आवश्यक असून तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव झालेला नाही ही चांगली गोष्ट आहे. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी अधिक कडक करावी जेणेकरून नवीन रुग्णांची भर पडणार नाही. तसेच उपचारासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घ्यावी. यंत्रणेसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री शासनस्तरावरून लवकरच देण्यात येईल. त्याचबरोबर सीएसआर निधीतूनही मोठ्याप्रमाणात मदत करण्यात येईल. महापालिकेने क्वारंटाईन ठिकाणी अधिकाधिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. शहरात कोविड रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी आरोग्य सेवा सुरू असाव्यात. विशेष करून ग्रामीण भागातील दवाखाने सुरू राहतील यावर लक्ष ठेवा. खासगी डॉक्टरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा असेही मंत्री राजेश टोपे म्हणाले.

138 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *