ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या – तुषार जाधव
बीड : केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्राच्या राखीव जागांमध्ये केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य समाजकार्य विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष तुषार जाधव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे केली आहे.
तुषार जाधव म्हणाले, वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र, सरकारने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्याथ्यांचे आरक्षण बेकायदेशीररीत्या कमी केल्यास ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतील. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३ जागांमधून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा आरक्षित असायला पाहिजे. परंतु, केवळ ३७१ जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी केवळ ३.८ टक्के एवढी आहे. त्याखालोखाल १३८५ जागा एससी ( १५ टक्के ) व ६६९ ( ७.५ टक्के ) जागा एसटीला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना ७ हजार १२५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची टक्केवारी ७३.७ टक्के एवढी असल्याचे जाधव यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी २७ टक्के, एससी १५ व एसटी ७.५ टक्के असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्व निकष, सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ३७१ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या २२०७ जागांसह एकूण ७ हजार १२५ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे ‘ जाधव म्हणले आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देऊन महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या २ हजार ५७८ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी तुषार जाधव यांनी केली आहे.