आर्थिक प्रगतीसाठी शेतीचा खरीप हंगाम मोलाचा : देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोरोनामुळे आर्थिक गतिविधी मंदावल्या असताना यंदाचा खरीप हंगाम यशस्वी झाला, तर त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. त्यामुळे हा हंगाम यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
राज्यातील शेती क्षेत्रातील प्रतिनिधींशी त्यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने संवाद साधला. या संवाद सत्राला केंद्रीय पंचायतीराज, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री पुरूषोत्तम रूपाला, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, अनिल बोंडे, पाशा पटेल उपस्थित होते. कापूस, सोयाबीन, कांदा, धान, द्राक्ष, ऊस, दाळिंब, संत्रा, काजू, सीताफळ, चणा, दूध उत्पादकांच्या विविध समस्या, आजच्या स्थितीत पीकविमा, शेतमाल खरेदी, कर्जमाफी इत्यादींची स्थिती याबाबत व्यापक आणि सखोल चर्चा यावेळी झाली. कोरोना संकटामुळे आर्थिक गतिविधींचा वेग मंदावला असल्याने यंदाचा शेतीचा हंगाम यशस्वी करण्यासाठी काय उपाय करावे लागतील, याबाबत निरनिराळ्या सूचना उपस्थितांनी दिल्या. हा हंगाम यशस्वी झाला, तर त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने शेतमालाची खरेदी पूर्ण क्षमतेने यशस्वी करणे याला प्राधान्य द्यायला हवे. जेएनपीटीच्या माध्यमातून आता कंटेनर वाहतूक सुद्धा सुरू झालेली आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी प्रतिनिधींशी ही चर्चा घडवून, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘किसान रथ’सारख्या अभिनव संकल्पनांची माहिती यावेळी दिली.
या संवाद सत्रात पुणे विकास संघाचे चंदन पाटील, डॉ. वार्ष्णेय (पुणे), किसान मोर्चाचे भाई मुंडे, आनंद राऊत (उमरेड), वासुदेव काळे (दौंड), हरिभाऊ जावळे (जळगाव), अजय गव्हाणे (परभणी), डॉ. अमोल कोहळे (वरूड), अरविंद नळकांडे (दर्यापूर), तुषार पवार (कराड, सातारा), अतुल काळसेकर (सिंधुदुर्ग), अजित गोगटे (सिंधुदुर्ग), राध्येश्याम मुंगमोडे (साकोली), दत्तात्रय पानसरे (अहमदनगर), शिवनाथ बोरसे (चांदवड), रमेश कोकाटे, अशोक धोटे (नागपूर), जगन्नाथ खापरे, श्याम गट्टाणी (बुलढाणा), नाना आखरे (नागपूर), विलास दहीभाते (जालना), सुनील सूर्यवंशी (चांदूर) इत्यादी प्रतिनिधी सहभागी झाले होते.