आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

  जालना (प्रतिनिधी) – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे  यांचे दि 1 ऑगस्ट रोजी रात्री दीर्घ आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 2 ऑगस्ट रोजी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला.    शारदाताई टोपे यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. कोरोनाच्या अनुषंगाने  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करत अत्यंत कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार सर्वश्री कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे, अंबादास दानवे, संदीप क्षीरसागर,बालाजी कल्याणकर, गुलाबराव देवकर, राजेश राठोड, कल्याणराव काळे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, चंद्रकांत दानवे, शिवाजीराव चोथे प्रकाश गजभिये, बदामराव पंडित, राजेश विटेकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, मनोज मरकड, महेबुब शेख, कल्याणराव सपाटे, नानाभाऊ उगले आदींची उपस्थिती होती.    यावेळी टोपे परिवारातील मनिषाताई टोपे, वर्षाताई देसाई, संग्राम देसाई, बाळासाहेब पवळ, उत्तम पवार, सतीष टोपे, शरद टोपे, संजय टोपे, अमोल टोपे, ॲड संभाजी टोपे, गणेश टोपे, दीपक टोपे, सुरज टोपे, संदीप टोपे, भैय्या टोपे यांनी शारदाताई टोपे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.  गेल्या पन्नास वर्षामध्ये माझ्या आईने एका शब्दानेही कोणाला न दुखावता सर्वांना प्रेमच दिले. संपुर्ण आयुष्यामध्ये आईने कुठल्याही गोष्टीची कधीच अपेक्षा केली नाही.  माझ्या जडणघडणीमध्ये वडीलांबरोबरच आईचाही मोठा वाटा होता. निखळ व निरपेक्ष प्रेमाच्या झऱ्याला आज मी मुकलो असल्याची भावना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.   शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे टोपे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.  केवळ टोपे परिवारच नव्हे तर संपुर्ण परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेश टोपे हे संपुर्ण महाराष्ट्राला कोरोनामधुन सावरण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यांना आधार देणाऱ्या शारदाताई यांच्या निधनामुळे कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  टोपे परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो तसेच त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असल्याची भावना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली.संयमी, अभ्यासु वृत्ती असलेल्या राजेश टोपे यांच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे राजेश टोपे हे आईच्या प्रेमापासुन पोरके झाल्याने आपणास तीव्र दु:ख झाले असुन टोपे कुटूंबियांना हे दु:ख सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक् केल्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार संतोष दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे यावेळी सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले.    तत्पुर्वी शारदाताई अंकुशराव टोपे यांचे पार्थिव त्यांचे मुळ गाव असलेल्या पाथरवाला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनीही तेथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *