आमदार ताई प्रशासनाला मदत करता येत नसेल तर करू नका, किमान नागरिकांमध्ये संभ्रम तरी पसरू नका – पृथ्वीराज साठे. लोखंडी सावरगाव रुग्णालयात उपलब्ध बेड बाबत नमिता मुंदडा खोटे आकडे का पसरवत आहेत – साठेंचा सवाल
अंबाजोगाई (दि. २५) :- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य विभागाने अत्यंत कमी वेळेत लोखंडी सावरगाव येथे उभ्या केलेल्या 1000 बेडच्या जम्बो कोविड रुग्णालयाबाबत आ. नमिता मुंदडा यांनी संभ्रम पसरवणे थांबवावे, येथे खरोखरच किती बेड शिल्लक आहेत हे स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहावे आणि मगच बोलावे. प्रशासनाला मदत करता येत नसेल तरी हरकत नाही किमान नागरिकांमध्ये संभ्रम पसरवू नये अशी कानउघडणी माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी केली आहे. आ. नमिता मुंदडा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे लोखंडी येथील कोविड रुग्णालयात केवळ 325 बेड असल्याचा पोकळ दावा करत तेथे योग्य उपचारासाठी डॉक्टर्स व अन्य स्टाफ अपुरा असल्याचे म्हटले होते. हे आरोप खोटारडे असून घरबसल्या केलेल्या उचापती असल्याचे पृथ्वीराज साठे यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली असून लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात 600 ऑक्सिजन बेड, 75 व्हेंटिलेटर बेड, 5 हाय फ्लो नजल ऑक्सिजन कॅन्यूला उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त एक्स रे, सर्व प्रकारच्या रक्त व अन्य तपासण्या यासाठीची मशिनरी उपलब्ध आहे, तसेच सिटी स्कॅन मशीनची मागणी केलेली असून ती मशीनही येत्या काही दिवसातच बसवण्यात येईल. या रुग्णालयात सध्या (दि.24 सायंकाळी पर्यंत) 244 रुग्ण उपचार घेत असून त्यांवर उपचार करण्यासाठी 12 पूर्णवेळ डॉक्टर काम करत आहेत, तसेच केज, अंबाजोगाई, परळी, धारूर आणि वडवणी या पाच तालुक्यातील खाजगी व सरकारी डॉक्टर्सना येथे सेवा देण्यासाठी त्यांच्या ड्युटी लावलेल्या आहेत. रुग्णालयात वॉर्ड बॉय आणि नर्सेस ची संख्या 150 हुन अधिक असून आणखी नियुक्ती करणेही सुरू आहे. अशी अधिकृत माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना 9000 रुग्ण संख्या पार करत आहे, अशावेळी त्याचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या पाठी उभे राहून मदत करणे अपेक्षित असताना आमच्या आमदार ताई घरबसल्या नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती का पसरवत आहेत हे न उमगणारे आहे. त्यांचे पती जाऊन कोविड रुग्णालयातल्या भाताला नावे ठेवतात इथपर्यंत ठीक होते, पण आता उपलब्ध सुविधा आणि बेड ची संख्या याबाबत संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे असल्याचेही पृथ्वीराज साठे यांनी म्हटले आहे. मी शासकीय रुग्णालयात उपचार घेऊनच ठणठणीत झालो दरम्यान मी लोकांमध्ये राहून कामे करण्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयातच उपचार घेऊन ठणठणीत बरा झालो. त्यामुळे आरोग्य विभागाने केलेल्या सोयी सुविधांवर माझा पूर्ण दृढ विश्वास आहे. त्याप्रमाणे अन्य लोकप्रतिनिधींनी शासकीय यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा असेही श्री. साठे म्हणाले. उदघाटनाला आला असतात तर बेड मोजून दाखवले असते! दरम्यान लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयाच्या शासकीय उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदारांना निमंत्रित केले होते, परंतु त्या आल्या नाहीत. आल्या असत्या तर प्रशासकीय व्यक्तिमार्फत त्यांना तेथील बेड मोजून दाखवले असते, असा टोलाही पृथ्वीराज साठे यांनी लगावला आहे.