LatestNewsबीड जिल्हा

आठवडाभरात ‘स्वाराती’ची अत्याधुनिक कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार ..!!

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेत परदेशातुन आलेली १५ अत्याधुनिक व भारतीय बनावटीची लहानमोठी ७० यंत्रे लावण्यात आली आहेत. येत्या चार दिवसात या प्रयोगशाळेत प्रायोगिक तत्वावर कोरोना विषाणुसह इतर महत्वाच्या विषाणु तपासणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अहवालांची तपासणी योग्य असल्याचा अभिप्राय आल्यानंतर कोरोना विषाणूच्या नियमित तपासण्याना सुरुवात होईल.

मार्च महिन्याच्या प्रारंभी महाराष्ट्रात कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात ‘विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा’ निर्मितीला मान्यता देण्यात आली होती. सदरील मान्यतेनंतर हाफकीन संस्थेच्या वतीने या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणाऱ्या १ कोटी ५ लाख रुपयांची अत्याधुनिक यंत्रे तर जिल्हा विकास यंत्रणा (डिपीडिसी) फंडातुन १ कोटी २१ लाख रुपयांची भारतीय बनावटीची ७० यंत्रे लावण्यात आली आहेत. यंत्रसामुग्रीसह प्रयोगशाळा तयार असल्याचा अहवाल नागपुर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेकडे पाठवण्यात आला आहे. स्वारातीच्या प्रयोगशाळेत सदरील संस्थेकडून पाठवण्यात आलेल्या विषाणुची तपासणी करुन त्याचा अहवाल नागपुर येथील संस्थेच्या अहवालासोबत जुळल्यानंतरच ही प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परीषदेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. त्यांची रीतसर परवानगी मिळाल्यानंतर या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विषाणु तपासणीस सुरुवात होणार आहे. सदरील सर्व प्रक्रिया आँन लाईन पुर्ण होणार असल्यामुळे प्रयोगशाळा सुरु होण्यासाठी कमीतकमी तीन आणि जास्तीतजास्त सहा दिवसांचा कालावधी लागु शकेल असे सांगितले जाते.

या विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेत विभाग प्रमुखांसह ९ डॉक्टर, ८ तंत्रज्ञ, ६ सहाय्यक तंत्रज्ञ आणि ८ शिपाई कार्यरत राहणार आहेत. भविष्यात ताण वाढला तर ही प्रयोगशाळा २४ चालु ठेवण्याचे नियोजन ही वैद्यकीय महाविद्यालयाने केले आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमीत देशमुख, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. टी.पी. लहाने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *