आज रात्रीपासून पुढील आठ दिवस बीड शहर कडकडीत बंद…!
बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून पॉझिटिव्ह ठरलेल्या एका रुग्णाने बीड शहरात अनेक ठिकाणी मोटारसायकलवर भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुढील आठ दिवस संपूर्ण बीड शहरात पूर्णत: कर्फ्यू लावण्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे.
त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर आठ दिवस शहर पूर्णत: बंद राहणार आहे.
बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहे. त्यातीलच एक बाधित रुग्ण बीड शहरात अनेक ठिकाणी फिरल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाने बीड शहरातील काही भाग कंन्टेन्मेन्ट झोन म्हणून जाहीर केले होेते. त्यानंतर आता संपूर्ण बीड शहरच पुढील आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या काळात बीड शहरात संपूर्ण कर्फ्यू लागू करण्यात येणार असून मेडिकल दुकाने, दवाखाने,वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.