आज पंतप्रधान लॉकडाऊन संदर्भात कोणती घोषणा करणार का याची उत्सुकता…?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन, जागतिक परिचारिका दिवस तसंच इतर विषयांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतील, अशी शक्यता आहे.
पंतप्रधानांनी कालच (11 मे) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेतही दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मोदी लॉकडाऊनसंदर्भात घोषणा करणार याचीही उत्सुकता आहे.मार्च महिन्यापासून पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा देशातील जनतेशी संवाद साधला होता. पहिला संवाद हा जनता कर्फ्यूची घोषणा करताना साधला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करताना, मग 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना मोदींनी तिसऱ्यांदा देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर आज (12 मे) रात्री आठ वाजता पंतप्रधान पुन्हा एकदा देशाला उद्देशून भाषण करतील