आजची तरुणाई आणि सोशलमिडीया…
कॉलेज लाईफ हा शब्द उच्चारला तरी अवघ विश्व डोळ्यापुढे तरळू लागत… अनेक मोरपंखी आठवणींचा ठेवा… नकळत तारुण्यात पदार्पण …त्याबरोबर आपसूक आलेलं शहाणपण… हा काळ म्हणजे आयुष्याचा महोत्सव, जिथे आपण खऱ्या अर्थाने घडत असतो. एका नव्या आयुष्याची सुरुवात होते. कुटुंबापासून लांब राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ. स्वतःला ओळखण्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात… बालपणीच्या मैत्रीपेक्षा वेगळा अनुभव देणारी माणसं भेटतात ,तोंड ओळखीचे रुपांतर कधी मैत्रीत होते, हे कळतच नाही आणि हे मैत्रीचं नातं असंच वृद्धिंगत व्हाव, त्यात आपुलकी, आपलेपणा असावा असं प्रत्येकाला वाटत असतं.या नवा विश्वात नव्या विचारांचा जन्म होतो, प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू होते. हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा बहराचा काळ. मित्राकडून जे जे चांगलं ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याकडून ची चांगुलपणाची उधळण व्हावी याची जाणीव व्हायला लागते. कॉलेज लाईफ म्हणजे मित्रमैत्रिणींचा घोळका… मौज… मजा… मस्ती …पार्किंगचा कट्टा …परीक्षेच्या आधीचा रट्टा. .. ट्रिप ची धमाल… वेगवेगळ्या days ची कमाल… सप्तरंगी यारी …जिंदगी की सवारी…पण हे एवढंच म्हणजे कॉलेज लाईफ नाही. याहून एक वेगळे आयुष्य आपण कळत-नकळत जगत असतो, अनेक व्यक्त अव्यक्त प्रसंगातून त्याची चाहूल येते, पण आपण समाजाचा एक घटक आहोत आणि त्यातील एका मोठ्या गटाचा प्रतिनिधित्व करत आहोत, आपल्या प्रत्येक कृतीचे पडसाद आपल्या जवळच्या व्यक्तींवर पर्यायाने समाजावर पण उमटत असतात. किशोर अवस्थेचा उंबरठा ओलांडून तारुण्यात प्रवेश करताना एक प्रचंड ऊर्जा घेऊन आपण या जगात आलेलो असतो. स्वतःला व्यक्त करत असतो, स्वतःची मते मांडत असतो, आणि त्याचे ठाम समर्थन करू लागतो. स्वतःची एक विचारधारा असणे यात काहीच वावगं नाही. उलट ते उत्तमच. या काळात आपण प्रत्येक घटनेला खूपच चटकन प्रतिसाद देतो, आक्रमक विचार जास्त जवळची वाटू लागतात .ती एकच विचारधारा योग्य आहे हा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. पण कोणतीही एकच विचारधारा – तत्त्व परिपूर्ण नसतेच. ती गुणदोषांसकट विकसित होत असते. हे जर आपण मान्य केले की, आपल्या तरुणाईचे अनेक प्रश्न सुटू शकतात. उदा. राजकीय विचारधारा.मी ही चुकू शकतो किंवा शकते ही जाणीव आपणास इतरांच्या चुका समजून घ्यायला आणि समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिकवते. समोरच्या व्यक्तीशी आपण सहमत नसलो तरी तिला तिच्या अभिव्यक्तीचा अधिकार आहे. ती चूकच आहे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच नाही. योग्य-अयोग्य काय ते काळाच्या ओघात ठरेल. तरुणाईचा काळ म्हणजे कात्रीत सापडले धाग्या प्रमाणे. एकीकडे आपल्या स्वप्नांची दुनिया खुणावत असते ,तर दुसरीकडे आई-वडिलांच्या अपेक्षा… कॉलेजमधील मौजमजा आणि अभ्यासाचे ओझे…. स्वतःचा एक वेगळा विचार आणि सोशल मीडियातून होणारा भडीमार …यात योग्य काय या गोंधळात आपल्यापैकी बरेच जण असतात . अर्थातच आपला प्राधान्यक्रम अभ्यास हाच असावा, कारण त्यावरच आपले आयुष्य आणि आई-वडिलांची स्वप्न आधारलेले आहेत. हा समतोल साधता येणे म्हणजेच जीवन. दोस्तहो, सध्या तरुणाई वास्तवापेक्षा सोशल मीडिया च्या आभासी दुनियेत अधिक रमते आहे.त्याचा वापर करणे वाईटच आहे असे नाही पण अतिरेक नक्कीच वाईट आहे. त्याचबरोबर राजकीय विचारधारांना फॉलो करणे हा ज्याच्या – त्याच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. तरुणांनी राजकारणात सक्रिय असायला हवं, त्यातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत सामाजिक जबाबदारी, सद्य स्थितीची जाणीव निर्माण होते . तरुण पिढीची राजकीय जागृती आणि सक्रियता ही देशहिताचीच आहे. पण आपण सध्या राजकीय साक्षरते पेक्षा विशिष्ट पक्षनिष्ठा किंवा विशिष्ट विचारधारेचे अंधभक्त होण्याची भीती अधिक दिसून येते. त्याची अनेक उदाहरणे आपणास सांगता येतील. श्रेष्ठत्व हे केवळ मी मानतो त्यातच आहे. हा विचार तरुणाई साठी घातक आहे. पर्यायाने समाज व देशाला मागे नेणार आहे. सर्वसमावेशकता, सहिष्णुता ही आपल्या देशाची ओळख आहे. आजची तरुणाई सामाजिक बदलाला प्रतिसाद देणारी, सहिष्णु, विवेकवादी, विचार तत्त्वांची चिकित्सा करणारी, प्रयत्नवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, अशावादी असायला हवी. कारण यावरच आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे.
लेखन – केशव विठ्ठलराव हासगुळे मो.9766600039