अल्लाह ची उपासना सर्वांना या संकटातून बाहेर काढणारी ठरो – माहे रमजान च्या धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा

परळी : आजपासून (दि.२५) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र महिन्यात अल्लाहची उपासना देशासह जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढणारी ठरावी असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच या पवित्र महिन्यात करण्यात येणारे नमाज पठण, ईफ्तार आदी धार्मिक विधी घरातच आपल्या कुटुंबियांसमवेत करावेत असे आवाहनही ना. मुंडे यांनी केले आहे.
एकीकडे सबंध जग कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीशी लढत असताना विविध धर्माचे अनेक सण उत्सव या दरम्यान होऊन गेले. भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे. याप्रसंगी संस्कृतीचे व आनंदाचे आदानप्रदान होत असते. परंतु कोरोना मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम, सामूहिक कार्यक्रम आदी सर्वांना दुर्दैवाने बंदी घालावी लागते आहे. 
अशा परिस्थितीत आजपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून या काळात मुस्लिम समाज बांधव कडक उपवास करत अल्लाहची उपासना करतात. समाजाला हर्षोल्हास व एकजूट प्रदान करणाऱ्या या पवित्र उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने विशेष नियमावली आखून दिलेली आहे. 
सर्व समाज बांधवानी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नमाजसाठी मस्जिद मध्ये एकत्र येण्याऐवजी आपल्या कुटुंबियांसोबत आपापल्या घरातूनच एकत्र नमाज अदा करून ईफ्तार घ्यावा, असे आवाहन करत आपली उपासना देशाला कोरोनाच्या भीषण संकटातून काढणारी ठरावी अशा शब्दात ना. मुंडेंनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *