अरे जालनेकरां, तू येडा आहेस कि खुळा.. बघा, कसा भरला माणसांचा पोळा.. वेड्याचे सोंग घेणाऱ्यांना, कसा घालायचा आळा..!
जालना : जालना शहरांमध्ये सकाळी सकाळी अक्षरशः माणसांचा पोळा भरल्यासारखं दृश्य पहावयास मिळत आहे. ऊठसूट पिशवी घेऊन माणसे हापापल्या सारखं रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ना गर्दी होण्याची भीती ना सामाजिक अंतर राखण्याचे तारतम्य. घे पिशवी, पड बाहेर.. अशी स्थिती सध्या जालन्या मध्ये दिसून येत आहे. काही महाभाग तर घरी करमेना म्हणून अक्षरशः फेरफटका मारण्यासाठी सकाळी सकाळी बाहेर चक्कर मारून येत आहेत. यावरून असे दिसून येत आहे की नागरिकांना अजूनही कोरोनाचे गांभीर्यच लक्षात आलेले नाही.
शासन, प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, कळकळीची विनंती करीत आहे, की विनाकारण घराबाहेर पडू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका, सोशल डिस्टेन्सिंग चे नियम पाळा. परंतु लोकांना स्वताःच स्वतःची काळजी नसल्यासारखे वागत आहेत.
संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. राज्याची अवस्था बिकट होत चालली आहे. लॉक डाऊन मुळे घरातील कर्ती व्यक्ती रोजगारा अभावी घरीच आहे, आणि खर्च चालू आहे, अशा स्थितीमध्ये घर चालवणे जसे अवघड झाले आहे, तसेच राज्याचे अर्थव्यवस्थेचे चाके थांबलेले आहेत. राज्याच्या तिजोरीत पैसा येण्याचे पूर्ण मार्ग थांबलेले आहेत. आणि राज्यावर खर्चाचा बोजा वाढलेला आहे. परंतु अशाच प्रकारे आपण बेफिक्रपणे वागत राहिलो तर काही ठिकाणी लाक डाऊन पुन्हा वाढण्याची संभावना वाढू शकते. म्हणून अशी गर्दी करणारे व विनाकारण बाहेर फिरणारे लोकं स्वतःसाठी व समाजासाठी घातक तर आहेतच, परंतु राज्यासाठी सुद्धा घातक ठरू शकतात याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.
पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस इमानेइतबारे कर्तव्य बजावून बजावून थेट कोरोना पॉजिटिव होऊ लागले आहेत. कोणासाठी तुमच्या आमच्यासाठीच ना?? कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित सुद्धा होत आहेत. दोन पोलीस कर्मचारी आमच्यासारख्या बेजबाबदार लोकांना सावरता सावरता थेट कोरोना बाधित होऊन त्यांचा मृत्यू झाला. तरी पण आम्ही येड्याच सोंग घेऊन सर्रास मोकाट फिरत आहोत. झोपलेल्या माणसाला एकदाच उठविता येईल, परंतु जे झोपेच सोंग घेत आहेत, त्यांना कसे उठवायचे?? शासनावर, प्रशासनावर प्रचंड ताण आहे, तरी पण आम्हाला मात्र त्याचं तारतम्य नाही.
प्रशासनाने अशा लोकांवर वेळीच आळा घलणे गरजेचे आहे. आज जालना जिल्हा जरी कोरोना मुक्त असला तरी संकट अजून टळलेले नाही. शेजारील औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.ही जालनेकरां साठी सुध्दा फार चिंतेची बाब आहे. म्हणून प्रशासनाने अजून कडक पावले उचलणे गरजेचे आहे.