अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आपल्या आजूबाजूच्या गरजूंना मदत करा – धनंजय मुंडें

परळी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या शुभमुहूर्तावर आपल्या आजू बाजूच्या गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्न – धान्य आदी बाबतीत मदत करावी असे आवाहनही केले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारने लॉक डाऊन वाढवले, त्यामुळे सामान्य माणसाचे जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. तसेच समाजातील हातावर पोट असलेल्या गोरगरिबांची परवड होत आहे. राज्य व केंद्र शासन या प्रत्येक दुर्बल घटकापर्यंत मदत पोहोचवण्याचा, अन्नधान्य पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. 
अक्षय तृतीया हा भारतीय संस्कृतीतील पवित्र दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, नवीन खरेदी केली जाते, दानधर्म केला जातो, तसेच काही ठिकाणी पितृ पूजन ही केले जाते; याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सक्षम नागरिकांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरजूंना या कठीण काळात अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आदी स्वरूपात अक्षय तृतीया च्या निमित्ताने मदत करावी असे आवाहन केले आहे.
अक्षय तृतीयाच्या निमित्ताने घरीच इष्ट देवतांचे पूजन, पितृ पूजन यांसारखे धार्मिक विधी करावेत, आपल्या कुटुंबियांसमवेत गोड धोड पदार्थ करून आनंद घ्यावा. तसेच विविध वस्तूंच्या नव्या खरेदीचा उत्साह राखून ठेवावा,  कोरोनावर विजय मिळवल्यानंतर येणारा प्रत्येक दिवस सुद्धा शुभमुहूर्तापेक्षा कमी नसेल, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *