अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी केंद्रीय स्तरावरही हालचाली, यूजीसीकडून लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता..!

नवी दिल्ली : विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावरुन महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगलं. पण आता अशाच पद्धतीचा निर्णय केंद्रीय स्तरावरुनही जाहीर होऊ शकतो. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत यूजीसीकडून गांभीर्यानं विचार सुरु आहे. तशी शिफारस लवकरच यूजीसीकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली जाऊ शकते. त्यामुळे कोरोनामुळे जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या या परीक्षा आता रद्द होऊन नवीन वर्ष ऑक्टोबरपासून सुुरु होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

कोरोनाच्या संकटामुळे प्रभावित झालेल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी यूजीसीने एप्रिल महिन्यात गाईडलाईन्स जाहीर केल्या होत्या. त्यात अंतिम वर्ष वगळता इतर वर्गांना सेमिस्टर परीक्षेसाठी काही सोपे पर्याय सुचवण्यात आले होते. मात्र अंतिम वर्षाच्या मुलांना परीक्षा द्यावी लागेल असं त्यावेळी यूजीसीनं म्हटलं होतं. पण आता देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा पार पाडणं हे शक्य दिसत नाहीय. त्यामुळे यूजीसीकडून यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय लवकरच जाहीर होऊ शकतो. या आधी महाराष्ट्र, हरियाणा, ओडिशासारख्या राज्यांनी या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनीही अशा पद्धतीनं परीक्षांबाबत विचार सुरु असल्याचं ट्टिटरवर कन्फर्म केलं आहे. यूजीसीला नव्या गाईडलाईन्स सुचवण्याची सूचना केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या निर्णय प्रक्रियेत एआयसीटीई, बार कौन्सिल, फार्मसी कौन्सिल, आर्किटेक्चर कौन्सिल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शाखांशीही सल्लामसलत सुरु आहे. एमसीआय ही मेडिकल अभ्यासक्रमाची संस्था मात्र परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने अनुकूल नाही. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यास त्याला यूजीसीकडून नेमका काय पर्याय सुचवला जातो, इतर वर्गाप्रमाणे अंतिम वर्षासाठीही आधीच्या सेमिस्टरचे गुण धरले जाणार का याची उत्सुकता असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *